गवत गवत
कळायला लागल्यापासूनच आपण गवताशी जवळीक साधून असतो. अगदी लहानग्या पावलांना नाजूकपणे चालवताना पायाखाली मऊ हिरव्या गवतासारखं दुसरं काहीच नसतं.
लहानपणच्या गोष्टीतल्या चिऊताइच्या घरट्यातल्या गवताच्या काड्यांपासून ते अगदी शेवटी अग्नी देण्यासाठी गोवऱ्या पेटवायला लागणाऱ्या गवताच्या काड्यांपर्यंत…
गवत जन्मभर साथ देतंच असतं.
आताशा हळूहळू गवत हरवू लागलंय.
अंगणात पायाला चिखल नको म्हणून गवताच्या मातीच्या जागी सिमेंटच्या फरश्या आल्यात.
खेळाच्या मैदानातही गवताची जागा कृत्रिम टर्फ ने घेतलीये.
काही वर्षांपूर्वी जश्या चिमण्या शहरांमधून नाहीश्या झाल्या, तसचं गवतही नाहीसं होतंय.
अतूट साथ देणाऱ्या ह्या गवताच्या वेगवेगळ्या रूपांबरोबर साधलेला हा एक चित्र-संवाद …
रंग रंगुल्या सान सानुल्या
गवत फुला रे गवत फुला …
पावसाळा सुरु झाला की काही दिवसातच अचानक सगळीकडे रंगीबेरंगी फुलांचा गालीचा निर्माण होतो.
जेमतेम तीन – चार आठवडे टिकणारी ही फुले पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या, किरमिजी, अशा अनेक रंगांची खैरात करीत येतात आणि पटकन जातात सुद्धा!
ओलाव्यावर पातळ गालीचा घातल्यासारखे उगवणारे शेवाळे आणि त्यावर येणारी जेमतेम १-२ मिमी आकाराची फुलं, त्यांच्यात अडकलेले पावसाचे थेंब थक्क करणारे असतात.
आणि गवताची पाती…
गवत आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असतं.
हिरव्या गदारोळातून उठून दिसणारं एखादंच पातं त्याची वाऱ्याशी चाललेली मस्ती ..
कुणाही फोटोग्राफरला स्वस्थ बसू देत नाही.
हिरव्या भिंतीतून पात्यांचे दरवाजे हवेबरोबर आपोआप उघडबंद होत असतात तेव्हा त्यांनी जेरबंद केलेला प्रकाश सुद्धा गमतीशीर हलत राहतो.
गवत पात्यांच्या रेषा रेषां मधून फिरणारा प्रकाश एकाच रंगाच्या इतक्या छटा तयार करतो, की चित्रकाराने सुद्धा बघत रहावे.
आणि प्रकाश ही तर छायाचित्रकाराची मूळ भाषाच!
पाठीवर प्रकाश घेउन विलक्षण रंग छटा घडवणाऱ्या गवत पात्यांचा मी आभारी आहे!
पण पावसाळ्याचे हिरवेगार आणि रंगबिरंगी दिवस काही काळच टिकतात. जसजसा पाउस उघडत जातो, तसतसा गवताचा रंगही उडत जातो. फुलं सरतात. हिरवेगार माळ किंचित तपकिरी व्हायला लागतात.
गवताच्या कौतुकाचे दिवस संपत आलेले असतात.
पण ह्या काळातही गवत खूप काही दाखवून जातं. हिरव्यातून तपकिरी कडे जाताना मधले लाल आणि किरमिजी रंग विशेष असतात.
हिवाळ्यातच सुकायला लागलेली मोडकी तोडकी पानं सुद्धा अजून जोमात ताठ उभी असतात.. थंडीच्या स्वागताला उभ्या असलेल्या भालदार-चोपदारांसारखी !
हिवाळ्यात तर गवताची मजा काही औरच असते.
दव थेंबांच्या ओझ्याखाली निथळणारी पाती मोत्याच्या चमकत्या सरांसारखी दिसतात हुबेहूब! आणि पात्यांच्या उतारावरून घरंगळत जाणारे थेंब पाहिले की मला नेहमी एक प्रश्न पडतो…
धुक्याच्या चादरीखाली हा गवत – दवाचा प्रणय आहे, का निसटत चाललेल्या काळाच्या दुःखाचे अश्रू आहेत.
चढत्या उन्हा बरोबर गवत सुकत जातं, कौतुकाची वेळ संपून जाते.
गवताची खरखर लागू नये, एखादा काटा टोचू नये म्हणून पावलं गवत चुकवू लागतात. गवत पायदळी तुडवू लागतात. वेळी-प्रसंगी जाळूही लागतात.
पण सूर्याला पाठीशी घेवून रंगांशी खेळण्याची गवताची सवय सुटत नाही.
पार जमिनीवर डोकं टेकवून गवतातले रंग शोधण्याची माझी जिद्द हटत नाही.
मी, गवत आणि कॅमेरा असं एक अजब नातं जडून गेलं आहे.
कोणत्याही जागी, कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्याही वेळी कधीही न चुकता मला रंगांचा खेळ दाखवल्या बद्दल आणि तुझ्या समोर नतमस्तक होवून तुझी अतूट मैत्री स्वीकारू दिल्या बद्दल,